बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक रंगभूमी दिन उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) : जगातील सर्व प्रयोगशील कलांचा उत्कर्ष व्हावा यासाठी जगभरात `जागतिक रंगभूमी दिन’ साजरा करण्यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्टिटय़ूटने १९६१ सालापासून मोठे प्रयत्न सुरू केले होते. २७ मार्च १९६२ पासून जागतिक रंगभूमी दिन जगभरात साजरा करण्यात येत आहे. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे चित्रकला स्पर्धा, नाट्यछटा सादरीकरण व बालक सुसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक रंगभूमी दिननिमित्त बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे गुरुवारी दि. २७ मार्च रोजी गुरुवर्य परशूराम विठोबा प्राथमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गणेश वंदना, नटराज पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक, शिक्षक कल्पना तायडे, योगेश भालेराव, कामगार अधिकारी भानुदास जोशी, गौरव लवंगाळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद ढगे यांनी केले तर योगेश शुक्ल यांनी जागतिक रंगभूमी दिनाचे महत्व सांगून, बालरंगभूमी परिषदेच्या आगामी उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय सणांची माहिती व्हावी या उद्देशाने भारतीय सण या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत २०० विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी सहभाग घेतला होता. चित्रकला स्पर्धेनंतर विद्यार्थिंनींनी नाट्यछटांचे सादरीकरण केले. कार्यक्रमात शेवटी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधत, मोबाईल व त्याचे दुष्परिणाम, जीवनात असलेले कलांचे महत्व याविषयी माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत.
यावेळी गुरुवर्य परशूराम विठोबा प्राथमिक विद्यालयात बालरंगभूमी परिषदेच्या बालरसिक मंचची स्थापना करण्यात आली. जागतिक रंगभूमी दिनाच्या औचित्याने राबविलेल्या बालरंगभूमी परिषदेने राबविलेल्या बालप्रेक्षक सभासद नोंदणी उपक्रमात विविध शाळांमधील ६४० विद्यार्थी-विद्यार्थिंनी यांनी बालरंगभूमी परिषदेचा ऑनलाईन गुगल फॉर्म भरून बालप्रेक्षक म्हणून आपली नोंदणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी नेहा पवार, आकाश बाविस्कर, दिपक महाजन, हर्षल पवार, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, आकाश भावसार, मनोज जैन व बालरसिक मंचचे समन्वय योगेश भालेराव यांनी परिश्रम घेतले.