जळगाव ( प्रतिनिधी ) – चिंचोली येथील तरूणावर किरकोळ वादावरून बसस्थानकाजवळ चाकूहल्ला रविवारी झाला होता. सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले .
निलेश दिलीप गडकर (वय-२१, रा. चिंचोली ) आईवडीलांसह वास्तव्याला आहे. तो नूतन मराठा महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत आहे. रविवारी रात्री निलेश घरी असताना त्याच्या गावातील गौरव शेळके याने फोन करून बोलावले . निलेश बसस्थानकाजवळ भेटायला गेला. त्यावेळी गौरव सोबत दिनेश शेळके, गोपाल शेळकेसह चार ते पाच जण हातात बॅट, हॉकी स्टिक आणि चाकू घेऊन उभे होते. तू ३१ डिसेंबरच्या पार्टीला जास्त बोलत होता, असे म्हणत गौरवने त्याच्या हातातील चाकूने निलेशच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. नंतर इतरांनी बॅट व हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सोमवारी निलेश गडकर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गौरव शेळके, दिनेश शेळके, गोपाल ज्ञानेश्वर शेळके ( सर्व रा. चिंचोली ) यांच्यासह ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो हे कॉ गफुर तडवी करीत आहेत .
गौरव शेळके (वय-२० , रा. चिंचोली )च्या फिर्यादीत म्हटले आहे की, निलेश गडकरने ३१ डिसेंबररोजी शिवीगाळ केली होती. याचा जाब विचारण्यासाठी गौरव २ जानेवारीरोजी बसस्थानकाजवळ आला होता. जाब विचारला असता निलेश गडकरने लोखंडी रॉडने डोक्यात घाव घातले. त्याचा भाऊ सागर गडकर आणि विनोद गडकर यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिघांनी दगड गौरव शेळकेच्या अंगावर मारले. यात गौरव जखमी झाला होता. त्याला जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी गौरव शेळके यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निलेश गडकर, सागर गडकर आणि विनोद गडकर ( तिघे रा. चिंचोली ) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना सचिन पाटील करीत आहेत .