भडगाव शहरात घडली होती घटना
भडगाव (प्रतिनिधी) : शहरात मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, कोठली रोड, भडगाव येथील गंभीर निष्काळजीपणामुळे अवघ्या चार वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या परिसरातील नाल्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये शाळेचे संस्थाचालक, संचालक, प्राचार्य आणि संबंधित वर्गशिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी न घेतल्यानेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
मृत मुलांची ओळख मयंक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे, रा. आदर्श कॉलनी, भडगाव) आणि अंश सागर तहसीलदार (वय ४ वर्षे, रा. बालाजी गल्ली, भडगाव) अशी असून, दोघेही आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ज्युनियर के.जी.मध्ये शिक्षण घेत होते. खेळकर व निरागस वयातच त्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फिर्यादी ज्ञानेश्वर रामदास वाघ हे कामानिमित्त गावाबाहेर असताना सकाळी सुमारे १० वाजता त्यांना फोनद्वारे माहिती मिळाली की शाळेतून दोन मुले बेपत्ता आहेत. ही बातमी कळताच नातेवाईकांनी तातडीने शाळेत धाव घेतली. शोध घेतला असता शाळेच्या शौचालयालगत असलेल्या उघड्या आणि पाण्याने भरलेल्या नाल्यात ही दोन्ही मुले पडलेली आढळून आली.
शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे नेले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. लहान मुलांच्या शौचालयालगतची संरक्षक भिंत तुटलेली होती, शौचालयाच्या अगदी बाजूलाच खोल आणि उघडा नाला वाहत होता, तसेच मुलांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. शाळा सुरू असताना मुले वर्गाबाहेर कशी गेली, याची कोणतीही नोंद किंवा देखरेख नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सर्व निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप एफआयआरमध्ये नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील राजेंद्र सोनवणे करत असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. शाळा व्यवस्थापनाची भूमिका, सुरक्षेचे नियम आणि प्रशासनाची परवानगी प्रक्रिया यांचाही सखोल तपास केला जाणार आहे. या घटनेनंतर भडगाव शहरात शोककळा पसरली असून, पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.









