चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- लिंबाच्या बागेत वडील काम करत असताना त्यांच्या बाजूला खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने झडप घालून ठार केल्याची घटना तालुक्यातील रांजणगाव शिवारात दि. २ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. गेल्या चार महिन्यांत बिबट्याचा हल्ला झाल्याची तिसरी घटना आहे.
चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात पुष्कर रवींद्र चव्हाण यांचे शेत असून शेतात लिंबाच्या बागेची राखण करण्यासाठी चार ते पाच महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कांज्या मांजऱ्या पावरा हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास आहेत. दरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान कांज्या पावरा हे लिंबाच्या बागेत काम करीत होते. यावेळी बाजूलाच त्यांची मुलगी रसेला (वय ४) खेळत होती. दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या बालिकेवर झडप घालत तिला ओढत नेले. सदरचा प्रकार लक्षात येताच कांज्या पावरा याने आरडओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावत आले. शेतकऱ्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यानंतर हल्ला करणारा बिबट्या तेथून पसार झाला.
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रसेला हिला तत्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची पोलीस स्टेशन व वनविभागात नोंद घेण्याचे काम सुरु होते. दरम्यान या भागात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. कन्नड घाट गावापासून जवळच असल्यामुळे बिबट्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात रांजणगाव ग्रामपंचायतीने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे रांजणगावच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.