जळगाव (प्रतिनिधी) – विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून काढून टाकले नाही तर तिचा अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी एका महाविद्यालयातील हॉस्टेल इंचार्जला पाठवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील एका महाविद्यालयात २२ वर्षीय विद्यार्थिनी ही कॉम्प्युटर सायन्सच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत आहे. ती महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहते. २२ मार्च रोजी हॉस्टेल इन्चार्ज यांच्या व्हॉटस्ॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून विद्यार्थिनीचा मॉर्फद्वारे तयार केलेला अश्लील फोटो कुणीतरी पाठविला. त्यात विद्यार्थिनीबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिला असून विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून काढून टाकावे नाहीतर फोटो व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी दिली होती.
हा प्रकार हॉस्टेल इन्चार्ज यांनी विद्यार्थिनींच्या कुटूंबियांना सांगितलं. २७ रोजी विद्यार्थिनी बाहेरगावाहून घरी आल्यानंतर कुटूंबियांनी घडलेला संपूर्ण प्रकार तिला सांगितला. फोटो पाहिल्यानंतर तो फोटो कुणीतरी मॉर्फ केला असल्याचे तिने कुटूंबियांना सांगितले. सोमवारी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.