भुसावळ शहर पोलीस स्टेशनची कामगिरी
भुसावळ (प्रतिनिधी) : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेथाजी मळा भागातून चोरट्याने जुलै २०२४ मध्ये महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ लांबवली होती. शहर पोलिसांनी या प्रकरणात आता दोन आरोपींना अटक केली. मात्र संशयितांनी हे वाहन अन्य एका संशयितास विक्री केल्यानंतर त्याची भंगारात विल्हेवाट लावल्याने आता तिसऱ्या आरोपीच्या अटकेनंतर या गुन्ह्याची पूर्णपणे उकल होणार आहे.
भुसावळ शहर हद्दीतील वाहन चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यवतमाळ जिल्ह्यातील अवधूतवाडी येथून संशयित आरोपी प्रफुल्ल गजानन गांगेकर यास अटक केली. आरोपीच्या अटकेकामी स्थानिक पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात आली. आरोपीच्या चौकशीत त्याने भुसावळातून चोरलेले वाहन नागपुरातील साथीदार सैफुद्दीन खान (नागपूर) यास दिल्याची कबुली दिल्यानंतर त्यासदेखील अटक करण्यात आली. मात्र संशयित आरोपीने चोरीनंतर हे वाहन अन्य एका संशयिताला भंगारात (स्क्रॅप) विक्री केल्याची कबुली दिली.
आता पोलिसांकडून तिसऱ्या संशयिताचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. तपास एएसआय विनोद नेवे करीत आहेत. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमाकांत पाटील, संदीप पालवे, पोलीस शिपाई राहुल भोई आदींच्या पथकाने केली आहे.