गावठी कट्ट्यासह विना नंबरची मोटारसायकल आढळली ; चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील लासूर गावात गेल्या एक महिन्यापासून अज्ञात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ माजवला होता. पुन्हा चोरीच्या उद्देशाने संशयीत गावात फिरत असल्याचे लक्षात आल्याने कोळी वाड्यातील तरूणांनी चार भामट्यांना धाडस करून रात्रीला दबोचले. तर बाकी साथीदार भामटे अंधाराचा फायदा घेवून पसार झाल्याची घटना दि. २ रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत माहिती अशी की, प्रवीण मगर पावरा (वय-२९), रमेश उर्फ बाबुराव साहेबराव पावरा (वय-२२), भगत मालसिंग पावरा (वय-२२), दिलीप पिंट्या पावरा (वय-१९) हे रात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या गावात फिरत असल्याचे लक्षात आल्याने गावातील तरुणांनी चौघांना पकडून झाडाझडती घेतल्याने त्यांच्याजवळ एक गावठी कट्टा व विना नंबर प्लेटची मोटारसायकल इत्यादी मिळून आले. त्यांच्या सोबत असणारे काही भामटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. चोपडा ग्रामीण पोलिसात माहिती दिल्याने गावकऱ्यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अभिजित पाटील, रितेश चौधरी, होमगार्ड रोशन बाविस्कर, श्रावण तेली यांच्या ताब्यात चोघांना दिले . याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला चार भामट्यांविरुद्ध पोकॉ. अभिजित जगदीश पाटील यांच्या फिर्यादीनुसार आर्म अँक्ट – ३२५/ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. राजू श्रावण महाजन हे करीत आहे. लासूर येथील तरुणांनी हे धाड्सकार्य केल्यामुळे त्यांचे गावात कौतुक होत आहे.