चाळीसगाव तालुक्यातील पाटणा जंगलातील घटना
चाळीसगांव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाटणादेवी जंगलात चंदनवृक्षाची तोड करणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली आहे. त्याच्याकडून १३ किलो चंदन लाकूड जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने संशयित आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली.
तालुक्यातील वनक्षेत्रांतर्गत पाटणा या जंगल भागामध्ये वनरक्षक, पाटणा व त्यांचे सहाय्यक रोजंदारी तत्त्वावरील वनसंरक्षण वनमजूर दि.१३ रोजी मध्यरात्री गस्त करीत असताना चंदनवृक्षाची तोड करणाऱ्या अज्ञात आरोपींची चाहूल लागली. ठिकठिकाणी दबा धरून पाठलाग केला असता आठ चंदन तस्कर संशयित आरोपी दिसून आले. त्यांना पकडण्यासाठी गेले असता, दोन आरोपींना पकडण्यात यश आले. तसेच त्यांच्याकडून २ नग कुऱ्हाड, २ लहान करवत, काळ्या रंगाची पिशवी त्यामध्ये स्वयंपाकाचे मसाले व इतर सामान तसेच ओल्या सालीसकट १३ किलो चंदन लाकूड माल सापडला तसेच झडतीत त्यांच्याकडे तीन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नावे पिंटू वाल्मिकी गिरे (वय -४४ वर्ष), शिवराम आबा मेंगाळ (वय ३६ वर्ष, दोन्ही रा. गुजरदरी ता.चाळीसगांव) असे आहे. सदर संशयितांवर वनरक्षक पाटणा यांनी गुन्हा दाखल केला. चाळीसगाव वन्यजीव चौकशी अधिकारी वनक्षेत्रपाल एम.के.रहाटकळ यांनी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली. दरम्यान दि.१६ रोजी चौकशी अधिकारी यांनी अटकेत असलेल्या दोन्ही संशयित आरोपी चाळीसगाव वन्यजीव परिक्षेत्रातील कर्मचारी यांच्यासह फरार व संशयित आरोपींचा शोध घेणे व तपास करणे कामी शोधमोहीम केली. त्यावेळी लोढरे (ठाकरवाडी) ता.नांदगाव जि. नाशिक येथे फरार आरोपी मच्छिंद्र विठ्ठल पोकळे, भाऊराव लक्ष्मण मेंगाळ, सुखदेव गणपत आव्हाळे हे घटनास्थळावरून फरार असल्याचे दिसून आले. दरम्यान अटक असलेला संशयित पिंटू वाल्मिक गिरे याने वेळोवेळी गुन्हे कामे वापरलेली त्याचे स्वतःची दुचाकी वाहन क्रमांक एमएच २० सीझेड ९५८९ जप्त करण्यात आली.