चाळीसगावात मध्यप्रदेशातील नराधमावर गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी):- शहरातील खडकी बायपास परिसरातील एका ३६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून, तिला अश्लील शिवीगाळ करत इन्स्टाग्रामवर तिच्यासह तिच्या मुलीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मध्यप्रदेशातील एका गुन्हेगाराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी राजसिंग अग्निदेवसिंग चौहान (रा. मरसरहा, जि. सीधी, मध्यप्रदेश) याने जुन्या वादातून हा प्रकार केला आहे. दि. १५ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत संशयित आरोपीने फिर्यादीच्या घरी येऊन “मी २१ दिवसांत जामिनावर सुटून आलो आहे” असे म्हणत त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाईल त्यांच्या संमतीशिवाय घेऊन गेला. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी आरोपीने फोन करून फिर्यादीला अत्यंत खालच्या थराला जाऊन अश्लील शिवीगाळ व धमकी दिली.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने इन्स्टाग्रामवर फिर्यादीच्या नावाने बनावट खाते उघडून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे मेसेज पाठवले. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, फिर्यादीच्या मुलीच्या फोटोवर “१५ हजार नाईट का है…” यांसारखे अश्लील आणि बदनामीकारक शब्द लिहून सोशल मीडियावर तिची बदनामी केली. या गंभीर प्रकारानंतर पीडित महिलेने चाळीसगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी राजसिंग चौहान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल विमल सानप तपास करीत आहेत.









