चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव नगरपरिषदेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार छत्रपती संभाजीराजे , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गणिततज्ञ भास्कराचार्यांच्या या कर्मभूमीला पर्यावरणासह धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिक महापुरूषांची स्मारकं उभी करत असताना शहर रचनेच्या दृष्टीने विचार करावा लागतो. कारण ही स्मारकेच या शहराच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि अस्मितेचे मानबिंदू ठरत असतात. शहराची शोभा वाढवणारी व पर्यटकांच्या आकर्षणाची स्थळे बनतात. अशाच प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे अश्वारूढ स्मारक चाळीसगाव नगरीचे भूषण ठरेल. या स्मारकाचे अनावरण करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.अशी स्मारके गावोगावी उभारणे जसे गरजेचे आहे, तसेच त्यांची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी सुध्दा आपली सर्वांची आहे असे छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी सांगितले.
याप्रसंगी छत्रपती खा संभाजीराजे , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील, खा. रक्षा खडसे, आमदार गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार एस.के.पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार चंदुभाई पटेल यांच्यासह हे स्मारक उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह लक्ष्मण शिरसाठ, आप्पा कुडेकर, बापू शिरसाठ, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, नगराध्यक्षा आशालता पाटील, स्थानिक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.