धुळे एसीबीची मेहुणबारे येथे धडक कारवाई
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – ११ वी प्रवेशासाठी शालेय फी व्यतिरिक्त दहा हजार रुपयांची लाच घेताना मेहुणबारे, ता. चाळीसगाव येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकासह लिपिकाला धुळे एसीबीने अटक केली. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षक गुलाब वीरभान साळुंखे (४५, मेहुणबारे, ता.चाळीसगाव) व लिपिक उल्हास भास्करराव बागुल (४२, प्लॉट नंबर ९, आदर्श नगर, चाळीसगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांचा मुलगा हा मेहुणबारे विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला. त्यास त्याच संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वी सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा होता. यासाठी तक्रारदार व त्यांचा मुलगा यांनी २७ मे रोजी वरील दोघांची भेट घेतली. त्यांनी मुलाच्या प्रवेशासाठी २० हजार रुपये लागतील, असे सांगत दहा हजार ऑनलाइन अर्ज केल्यावर व उर्वरित १० हजार रुपये शाळेत प्रवेश घेताना द्यावे लागतील, असे सांगितले.
यावर तक्रारदाराने २८ मे रोजी धुळे एसीबीकडे तक्रार दिली. शुक्रवारी सायंकाळी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच घेताना गुलाब साळुंखे यांना पकडण्यात आले व त्यानंतर लिपिकालाही अटक करण्यात आली. आरोर्पीविरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात हवालदार राजन कदम, हवालदार संतोष पावरा यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.