आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास; गवळी समाजाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय !
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहर विकास आघाडीच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग क्रमांक १० मधील अपक्ष उमेदवार सौ. अलका सदाशिव गवळी यांनी मोठा राजकीय निर्णय घेत आपला पाठिंबा भारतीय जनता पक्षाला जाहीर केला आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या ‘द बेस्ट चाळीसगाव’ या व्हिजनवर विश्वास ठेवत आणि गवळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी हा पाठिंबा दिला.

सौ. गवळी यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. प्रतिभाताई चव्हाण आणि प्रभाग क्रमांक १० मधील भाजपच्या नगरसेवकपदाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. याबाबतचे अधिकृत पत्र त्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.
‘व्हिजनला अडथळा होऊ नये’ म्हणून उमेदवारी मागे!
आपल्या पाठिंबा पत्रात सौ. अलका गवळी यांनी स्पष्ट केले की, चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी प्रभाग क्र. १० अ मधून अपक्ष अर्ज भरला होता. “मात्र, माझ्या उमेदवारीमुळे चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार श्री. मंगेश दादा चव्हाण यांच्या ‘द बेस्ट चाळीसगाव’ घडविण्याच्या व्हिजनला कोणताही अडथळा येऊ नये,” या उदात्त हेतूने त्यांनी सद्सद्विवेकबुद्धीने उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी जाहीर केले की, आपला पूर्ण पाठिंबा भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण आणि प्रभागातील सर्व भाजपच्या अधिकृत उमेदवारांना असेल.
सौ. गवळी यांनी प्रभाग क्रमांक १० मधील सर्व मतदार बंधू-भगिनींना भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आपले व माझे नाते केवळ राजकीय नसून ते घरचे आपुलकीचे आणि विश्वासाचे आहे.” आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून प्रभागात आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा आणि भविष्यात होणाऱ्या योजनांचा विचार करून त्यांनी नागरिकांना भाजपला पाठिंबा देण्याची विनंती केली.

”चाळीसगावच्या भावी पिढ्यांसाठी… आम्ही मंगेश दादांच्या पाठी…!” हा विचार घेऊन उभे राहण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. चाळीसगाव शहराचा विकास लक्षात घेता, सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांना नगराध्यक्ष पदी आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे कळकळीचे आवाहन सौ. अलका गवळी यांनी केले आहे.









