भव्य रॅली, जाहीर सभा आणि महापुरुषांना वंदन; भाजपच्या ३७ उमेदवारांची निवडणूक तयारी
चाळीसगाव (प्रतिनिधी ) – भारतीय जनता पक्षाने (भाजप) चाळीसगाव नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केल्यानंतर आज सोमवार दि. १७ रोजी भाजपच्या वतीने शहरात जोरदार ‘शक्तिप्रदर्शन’ करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी सौ. प्रतिभा चव्हाण आणि नगरसेवक पदासाठी उर्वरित ३६ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य जाहीर सभा
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे एका भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून वाजत गाजत काढलेल्या रॅलीनंतर सर्व उमेदवार सभास्थळी दाखल झाले.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील, माजी आमदार साहेबरावजी घोडे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी आणि शहर-ग्रामीण मंडळ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचंड गर्दीने भाजपची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

संत जगनाडे महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,वीर भाई कोतवाल या महापुरुषांना वंदन करून त्यांनी नव्या राजकीय जबाबदारीसाठी प्रेरणा घेतली.










