संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको, चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : आजोबांसोबत फिरायला गेलेल्या तीन वर्षीय बालकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने मंगळवारी दि. १३ ऑगस्ट रोजी चिरडल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कंटेनरची तोडफोड करीत रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ता. चाळीसगाव येथे हा अपघात १३ जुलैला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडला.
गावातील सचिन जगन्नाथ गोरे यांचा मुलगा जीवन (वय ३) हा त्याचे आजोबा जगन्नाथ गोरे यांच्यासोबत दि. १३ ला सकाळी बसस्थानकावर आलेला होता. आजोबा त्याला चॉकलेट घेऊन देत असताना जीवन रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्याचवेळी हिरापूर रोडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात जीवन हा पुढील चाकाखाली दाबला गेला. ग्रामस्थांनी जीवनला कंटेनर खालून काढून तळेगाव आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून तत्काळ चाळीसगावला ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले.
अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी कंटेनर चालक लक्ष्मण फोरन सिंग (रा. बढा खुर्द कारस, जि. अलिगड, उत्तरप्रदेश) याला चांगलाच चोप दिला. तर जमावाने कंटेनरची देखील तोडफोड केली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र संतप्त ग्रामस्थ ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक टाकले जात नाही, तोपर्यंत एकही वाहन रस्त्याने जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे नांदगाव रस्त्यावर दूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर गतिरोधक झाल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला. दरम्यान, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.