आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश; विद्यार्थ्यांच्या प्रगतीला मिळणार हातभार
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) :- येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींकरिता कार्यरत असलेल्या शासकीय निवासी शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्याकरिता ६ कोटी ६७ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आ. मंगेश चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून, यामुळे शाळेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालणाऱ्या या निवासी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळेच्या आवारातच निवासाची सोय उपलब्ध व्हावी, जेणेकरून त्यांना विद्यार्थ्यांसोबत कायमस्वरूपी राहता येईल आणि त्यांच्यावर योग्य संस्कार करता येतील, अशी मागणी सातत्याने केली जात होती. तसेच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला आणि क्रीडा गुणांना वाव देणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्याची गरज होती. या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी वेळोोवेळी शाळेला भेट देऊन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती.
दिनांक ११ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, या बांधकामासाठी ६.६७ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता शाळेच्या परिसरातच निवासाची व्यवस्था उपलब्ध होणार असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही हातभार लागणार आहे.
या निधी मंजुरीबद्दल आ. मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्याचे सामाजिक न्याय विभाग मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचे आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कारा” मध्ये चाळीसगाव येथील शासकीय निवासी शाळेला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. नुकताच मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभाग मंत्री यांच्या उपस्थितीत शाळेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल आ. मंगेश चव्हाण यांनी जळगाव समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेशसिंग पाटील, मुख्याध्यापिका सोनाली महाजन यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.