चाळीसगाव बसस्थानक येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- आईला बसमध्ये बसवण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील २४ हजारांचे मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलींना चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
येथील शास्त्रीनगरमधील लता रवींद्र जाधव या दि. २० रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या आपल्या आईला भेटण्यासाठी चाळीसगाव बस स्थानकावर आल्या होत्या. आईची भेट घेऊन त्यांना पाचोरा बसमध्ये बसवले व त्या खाली उतरल्या. यादरम्यान त्यांच्या गळ्यातील २४ हजारांच्या मंगळसुत्राची चोरी झाल्याचे उघड झाले. त्यांनी तत्काळ चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. दरम्यान, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच हवालदार प्रशांत पाटील, पो.कॉ. संदीप मोरे, पवन पाटील, पो.कॉ. अंजली पवार यांनी शोध सुरु केला.
दरम्यान, कन्नड नाक्याजवळ वृद्ध महिला व दोन अल्पवयीन मुली संशयीतरित्या दिसल्या. पथकाने त्यांची चौकशी केली असता त्या गंगापूर तालुक्यातील गायरान येथील असल्याचे त्यांनी सांगितले. तर बसमधील चोरीबाबत विचारले असता आजीने चोरी केल्याचे उत्तरे मिळाल्याने संशय बळावला. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ सोन्याचे डोरले, मणी, चाकू, ब्लेड तसेच सोन्याचा मणी असा ऐवज मिळाला. महिला व अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले असून तपास हवालदार प्रशांत पाटील करत आहेत.