चाळीसगाव (प्रतिनिधी) :- कारमधून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवार दि. ७ जानेवारी रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास हनुमानवाडी परिसरात घडली. यामध्ये बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी ७ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (वय ३१ वर्षे, धंदा मजुरी, रा. लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली आहे. उददेश उर्फ गुडडू शिंदे (रा. हिरापुर), सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव), सॅम चव्हाण (रा. हिरापुर), भुपेश सोनवणे (रा. चाळीसगाव), सुमित भोसले (रा. चाळीसगाव), संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.
तसेच बैसाणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला तर सुमित भोसले आणि संतोष निकुंभ हे देखील या कटात सहभागी होते. महेंद्र मोरे यांच्या सहकाऱ्यासह त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. मोरे यांच्यावर आठ गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. यात ते गंभीर जखमी झाले.
मोरे यांच्या पायाला दोन, दंडाला एक आणि एक गोळी छातीला लागली. शिवाय एक गोळी पोटाला चाटून गेल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले. दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता पोलिसांची अतिरिक्त कुमक चाळीसगावात मागवण्यात आली आहे.
हल्लेखोरांनी बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्यावर मोरे यांना वाचविण्यासाठी अजय बैसाणे गेले असता त्यांच्यावर देखील फायरींग करण्यात आली. परीसरात दहशत माजवून ते सर्व हल्लेखोर शेवरलेट बिट्स कपंनीच्या कारमध्ये बसून नारायणवाडी पेट्रोलपंपाच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिसांचे तीन पथक रवाना झाले असून एलसीबी देखील संशयितांचा शोध घेत आहे.