विश्वासघाती चुलत जेठाला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केली अटक
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावाच्या शिवारामध्ये पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आलेल्या चुलत जेठाने त्याची तरुण पत्नी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर टॉवेलने तोंड दाबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावामध्ये १९ वर्षीय विवाहिता पतीसोबत राहते. शेतीकाम करून तिचा परिवार उदरनिर्वाह करतो. दरम्यान शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास तरुण विवाहिता घरी एकटी होती.(केसीएन) त्यावेळेला तिच्या पतीसाठी जेवणाचा डबा घेण्याकरिता तरुणीचा चुलत जेठ संजय मधुकर जाधव (वय ४१) हा आला. त्याने तरुणीवर वाईट नजर ठेवून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत टॉवेलच्या साह्याने फिर्यादी तरुणीचे तोंड दाबून जबरदस्तीने बलात्कार केला.
या प्रकरणी शनिवार दि. १ मार्च रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी संजय मधुकर जाधव याला अटक करण्यात आली आहे.(केसीएन)तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. दरम्यान बलात्काराच्या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.