चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळेगाव येथील २४ वर्षीय तरुणाने शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि. १८ रोजी सकाळी ७ वाजेच्या पूर्वी घडली. मात्र, तरुणाने आत्महत्या केली नसून, हा घातपात असल्याचा आरोप करीत मृत तरुणाच्या नातलगांनी त्याचा मृतदेह सायंकाळी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आणला होता. जोपर्यंत संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका यावेळी नातेवाईकांनी घेतली.
नातलगांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या दिला. दरम्यान, या घटनेची चौकशी करून त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी ६ वाजता मृतदेह तळेगाव येथे नेण्यात आला. प्रदीप मुकुंदा गायकवाड (वय २४, रा. तळेगाव ता. जामनेर) हा कृष्णानगर तांडा शिवारात शेताच्या बांधावर कडूलिंबाच्या झाडाच्या फांदीला दोर बांधून गळफास घेतल्याने मृतावस्थेत मिळून आला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली. याप्रकरणी कृष्णा सुका गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
प्रदीप गायकवाड याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, प्रेमभंगाच्या नैराश्याने गळफास लावून आत्महत्या केली असावी, त्याची चौकशी व्हावी, असे कृष्णा गायकवाड यांनी दिलेल्या खबरीत म्हटले आहे. मयत प्रदीप याने गळफास लावून घेतला नसून, त्याचा घातपात केल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त करत प्रदीप याचा मृतदेह शववाहिकेतून थेट चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आणला. पोलिसांनी मयत तरुणाच्या नातेवाइकांची समजूत घातली आणि कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेऊन तळेगाव येथे पुढील अंत्यविधीच्या कार्यवाहीसाठी नेला