श्रीनगर ( वृत्तसंस्था ) – जम्मू – काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. शनिवारी भारतीय सैन्याने लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याला ठार केलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगल भागात शोधमोहीम राबवली जात आहे. ही शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे.
भारतीय सैन्याच्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरसह दोन सैनिक शहीद झाले. या दोन जवानांच्या मृत्यूसह पुंछच्या सुरणकोटे जंगलात सोमवारी सुरू झालेल्या कारवाईत आतापर्यंत नऊ सैनिक शहीद झाले आहेत. गुरुवारी ज्या ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक झाली त्या ठिकाणाजवळ मेंढरच्या नर खास वन परिसरात एक जेसीओ आणि जवानाचे मृतदेह सापडले.
छमधील सुरक्षा दलांवर हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या परिसरात उपस्थित होते. जम्मू प्रदेशातील राजौरी आणि पुंछ भागात यावर्षी जूनपासून घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत.
श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये शनिवारी झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दहशतवाद्यांनी दोन स्थानिकांना गोळ्या घालून ठार केलं. बिहारच्या बांका जिल्ह्यातील रहिवासी अरविंद कुमार साह (३० वर्ष) यांची शनिवारी संध्याकाळी श्रीनगरमधील ईदगाहजवळील उद्यानाच्या बाहेर दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. गोळी लागल्याने साहचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आणि व्यवसायाने सुतार असलेला सगीर अहमद यालाही गोळ्या घातल्या. अहमदचा रुग्णालयात मृत्यू झाला.