मुंबई (वृत्तसंस्था) – खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते पक्षत्याग करणार नसल्याचे सांगत तुमचा गुलाबरावांवर विश्वास असला तरी नाथाभाऊंवर नाही.असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी आज मारला.
आज भाजपचे राज्यभरात आक्रोश आंदोलन सुरू आहे. या अनुषंगाने पुणे येथील आंदोलनात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील हे सहभागी झाले. याप्रसंगी साहजीकच त्यांना पत्रकारांनी एकनाथराव खडसे यांच्याबाबत बोलते केले. “एकनाथ खडसे यांचे पक्षांतर निश्चित आहे”, असं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी नुकतचं म्हटलं आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, “नाथाभाऊंनी वारंवार सांगितले आहे की ज्या पक्षात मी वाढलो, मोठा झालो त्या पक्षाचे नुकसान मी करणार नाही. मात्र, तरीही तुमचा गुलाबरावांवर विश्वास आहे, आमच्या नाथाभाऊंवर नाही ! ” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राज्यात तरुणी आणि महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. मात्र, सरकार याबाबत काही करताना दिसत नाही. उद्धव ठाकरे जागे व्हा, सत्तेसाठी तुम्ही आंधळे-बहिरे आणि संवेदना शून्य झाला आहात. उत्तर प्रदेशातील तरुणीबाबत घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. यातील आरोपींना पकडण्यात आले असून त्यांना कडक शिक्षा दिली जाणार असल्याचे, तेथील सरकारने जाहीर केले. मात्र, आपल्या राज्यात देखील अशा घटना घडत आहेत. त्याबद्दल मोर्चे किंवा कँडल मार्च का काढले जात नाहीत? प्रश्न त्यांनी याप्रसंगी विचारला. या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र लढा उभारला जाणार असल्याचा इशारा त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.