रावेर पोलिस स्टेशनची कामगिरी
रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर शहरात नुकत्याच झालेल्या पारंपरिक रथयात्रेदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका महिलेला रावेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. महिलेकडून चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला असून, तिच्या अटकेमुळे तीन वेगवेगळ्या महिलांचे मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि.५ डिसेंबर रोजी रावेर शहरात नेहमीप्रमाणे रथयात्रा आयोजित करण्यात आली होती. या रथयात्रेमध्ये दर्शनासाठी आलेल्या महिलांना गर्दीचा फटका बसला. पल्लवी विशाल पाटील (रा. शिवाजी चौक, रावेर) यांचे सुमारे दीड ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र (पोत) चोरीस गेले. याच दरम्यान, राजश्री चौधरी आणि रोहिणी भिडे यांच्याही गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आले. या तिन्ही महिलांनी एकत्रित येऊन दुसऱ्याच दिवशी, दि. ०६ डिसेंबर रोजी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल होताच, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या.
पोलिसांनी सर्वप्रथम परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र गर्दीमुळे चोरट्या महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. गुन्हे शोध पथकाने यात्रेत सहभागी झालेल्या लोकांकडून त्यावेळचे मोबाईल शूटिंग आणि फोटो मिळवले. या मिळालेल्या व्हिडिओंपैकी एका फुटेजमध्ये संशयित महिलेचा चेहरा आणि राहणीमान स्पष्टपणे दिसले. या वर्णनाच्या आधारे गुन्हे शोध पथकाने संपूर्ण यात्रेच्या परिसरात संशयित महिलेचा शोध सुरू केला.
काही काळानंतर पोलिसांना वर्णनाशी जुळणारी एक महिला संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. तो जप्त करण्यात आला आहे. सदर संशयित महिलेचे नाव संजना रोहेल शिंदे (वय: २० वर्ष, मूळ रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना,ह.मु. बोइसर, जि. ठाणे) असे आहे. सदर महिलेवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत रावेर पोलीस स्टेशनचे पो. नि. डॉ. विशाल जयस्वाल, स. पो. नि. मिरा देशमुख, आणि गुन्हे शोध पथकातील पो. ना. कल्पेश आमोदकर, पो. शि. विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, सुकेश तडवी, तथागत सपकाळे, संभाजी विजागरे, मपोशि. पुजा साळी यांचा सक्रिय सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास स. पो. नि. मिरा देशमुख या करत आहेत.









