रावेर शहरातील शिक्षकासोबत घडली घटना
रियाज मुहम्मद यांच्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री १२ वाजल्यानंतर घडली. त्यांच्या खात्यात एकूण ४१,२१९ रुपये जमा होते. मात्र सकाळी मोबाईल तपासल्यानंतर त्यांना लक्षात आले की १०,००० रुपये चार वेळा, १,००० रुपये एकदा आणि १ रुपया एकदा, अशा प्रकारे एकूण ४१,००१ रुपये डेबिट झाले आहेत. विशेष म्हणजे, ही रक्कम ट्रान्सफर करताना त्यांना कोणताही ओटीपी, मेसेज किंवा कोणतीही लिंक आलेली नव्हती. सदर प्रकार लक्षात येताच रियाज यांनी तातडीने सेंट्रल बँक रावेर शाखेशी संपर्क साधला.
शाखा व्यवस्थापक पवन चौधरी व उपव्यवस्थापक आशिष ताज यांनी तत्काळ प्रतिसाद देत खात्याची प्रक्रिया थांबवून संबंधित माहिती मुख्य शाखेला मेलद्वारे कळवली. तपासादरम्यान, ही रक्कम एअरटेल यूपीआय द्वारे Www Woohoo या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सायबर सेलचे श्रीकांत चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.