विविध मुद्द्यांवर नोंदविला जबाब
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव व जळगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी जळगावात आलेल्या सीबीआयच्या पथकाने मंगळवारी दिनांक १७ डिसेंबर रोजी तक्रारदार नीलेश भोईटे यांची साडेतीन तास चौकशी करण्यात आली. यात त्यांच्याकडून विविध मुद्यांवर पथकाने माहिती जाणून घेत जबाब लिहून घेण्यात आला.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत या शैक्षणिक संस्थेच्या वादप्रकरणी कट रचून संस्थेचे सचिव नीलेश भोईटे यांच्या घरात सुरा ठेवणे व इतर घडामोडीप्रकरणी ७ ऑक्टोबर २०२२ रोजी, जळगाव शहर पोलिस ठाण्यात नीलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पुरवणी जबाबावरून अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या पथकाने जळगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तक्रारदार नीलेश भोईटे यांची मंगळवारी चौकशी केली. भोईटे हे सकाळीच चौकशीसाठी हजर झाले होते. मात्र त्यांची दुपारी चौकशी सुरू झाली व ती संध्याकाळपर्यंत चालली. तत्पूर्वी सोमवारी नीलेश भोईटे यांचे चुलत भाऊ मयुरेश भोईटे यांची चौकशी करण्यात आली होती. नीलेश भोईटे यांच्या घरात सुरा ठेवणे व कागदपत्रे चोरीप्रकरणात काही कागदपत्रांचे बनावटीकरण झाले असून ती कागदपत्रे आपण सादर करणार असल्याची माहिती नीलेश भोईटे यांनी सांगितले. प्रकरणाची पाळेमुळे जिल्हा बँकेपर्यंत असल्याचे बोलले जात आहे.
‘बीएचआर’ प्रकरणी दाखल गुन्ह्यात झंवर परिवाराला मदत करण्यासाठी त्रयस्थ इसमामार्फत तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी लाच मागितल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्हाप्रकरणी तक्रारदार सुरज झंवर यांची बुधवारी दिनांक १८ डिसेंबर रोजी चौकशी करण्यात येणार आहे.