मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे बहिणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर भावाने स्वतःच्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून ठार केले. त्यानंतर स्वतः देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
याबाबत सविस्तर माहिती असी की मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे बुधवारी (दि. १७) समीर भिवाजी तावरे (वय ३५) यांची बहिण माया सोपान सातव (वय ३२) या घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा कुटुंबीय शोध घेत होते. आज गुरुवारी (दि. १८) माया यांचा मृतदेह विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर हा धक्का बसलेल्या समीर याने , घरी येऊन पत्नी वैशाली तावरे (वय २८) हिच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करुन ठार केले. या घटनेनंतर संतप्त अवस्थेतील समीर याने स्वतःही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांना समजताच, त्यांनी समीरला तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
समीर तावरे याच्यावर सध्या दौंड येथे उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती कळताच मांडवगण फराटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून तपास सुरू केला आहे.