चेन्नई (वृत्तसंस्था) – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने भारतीय संघात पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे येथे सुरू असलेल्या सराव सत्रात दाखवुन दिले आहे. मात्र, आपल्या कठीण काळात इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) चेन्नई सुपरकिंग संघाबद्दल भावनिक होत कृतज्ञता व्यक्त केली आहे. चेन्नई संघाने मला कायम पाठिंबा दिला. कठीण काळात माझ्या पाठीशी हा संघ सातत्याने राहिला. मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेर देखील मला पाठिंबा मिळाला, असे धोनीने व्यक्त केले.
चेन्नई संघाचे चाहते आपल्या लाडक्या धोनीला थाला असे संबोधतात. थाला म्हणजे भाऊ, त्यामुळे येथील चाहत्यांसाठी धोनी त्यांच्या भावासारखा आहे, हेच सिद्ध होते. गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य लढतीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे संघाचे स्पर्धेतील आव्हान संपले होते. या सामन्यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यावेळी तो पुनरागमन करणार की निवृत्तीचा निर्णय घेणार यावर चर्चा सुरू झाल्या होत्या. धोनीने मात्र याबाबत कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, तसेच जानेवारीनंतर बोलू असे सांगत त्याने चर्चांना पूर्णविराम दिला होता. आता आयपीएलद्वारे भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेल्या धोनीने चेन्नई संघाच्या सराव शिबिरात फलंदाजीचा सराव करत आपल्या कमबॅकचे संकेत दिले आहेत.