अमळनेर हादरले; सिंधी कॉलनीवर शोककळा, बचावाचे प्रयत्न निष्फळ
अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


मृतांमध्ये मानव बंटी रतनानी (वय १४), कार्तिक विकी उधवानी (वय १४) आणि दिनेश विजय पंजवानी (वय १७) या तिघांचा समावेश असून, ते सर्व सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी होते.
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी तिघेही मित्र खदाण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. पाण्यातून चालत ते एका उंचवट्यावर पोहोचले. यावेळी सेल्फी काढत असताना एका मुलाचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या मित्राने हात दिला, तर दोघांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिसराही खोल पाण्यात ओढला गेला. अवघ्या काही क्षणांत तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक नागरिक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. देवळी येथील दीपक मोरे यांनी धाडसाने पाण्यात उतरून तिघांनाही बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरभरातून हळहळ व्यक्त केली जात असून, धोकादायक व पाण्याने भरलेल्या खदाणी परिसरात सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.








