सोयगाव तालुक्यातील पळाशी धारकुंड येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मित्रांसोबत सोयगाव तालुक्यातील पळाशी धारकुंड येथे फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा दगडावर साचलेल्या शेवाळावरून पाय घसरुन कुंडात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि. २१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सोमवारी त्याचा मृतदेह पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधून काढला. सोयगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गौरव नेरकर (२१, रा. खंडेराव नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. गौरवचे वडील जळगावात कंपनीत कामाला आहेत. गौरव हा गॅरेजवर काम करुन कुटुंबाला हातभार लावत असे.(केसीएन)त्याचा लहान भाऊ शिक्षण घेत आहे. दरम्यान रविवारी दि. २१ जुलै रोजी गौरवसह १६ जणांचा समूह हा सोयगाव तालुक्यातील पळाशी धारकुंड येथे फिरायला गेला होता काही ठिकाणी पाहिल्यानंतर तेथील पाण्याच्या कुंडाजवळ आले असताना गौरव शेवाळ्यावरून पाय घसरून पडला.
घटना मित्रांना समजताच त्यांनी आरडाओरड केली. काही तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या, मात्र गौरव सापडला नाही. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. (केसीएन)रात्री शोधकार्यात अडचणी येत सोमवारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य केले. त्यावेळी गौरवचा मृतदेह सापडला. बनोटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. सोमवारी सायंकाळी गौरवचा मृतदेह जळगावात आणण्यात आला व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.









