जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मोहन टॉकीज परिसरातील एका २८ वर्षीय तरुणाचा पाय घसरुन धरणात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. २६ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज येथे घडली. ग्रामस्थांच्या मदतीने धरणातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागर मुरलीधर सोनवणे (वय २८, रा. असोदा रोड) असे मयत तरुणाचे नाव आहे. शहरातील असोदा रोड परिसरात सागर सोनवणे हा तरुण वास्तव्यास होता. त्याच परिसरात तो मासे विक्री करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. सागरच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ व बहिण असा परिवार आहे.नेहमीप्रमाणे सागर हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे मासे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान, भिंतीवरुन पाय घसरल्याने तो धरणाच्या पाण्यात पडल्याने बुडाला. ही घटना त्याठिकणी मासे पकडण्यासाठी गेेलेल्या काहीजणांच्या लक्षात आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, ग्रामस्थांसह मासे पकडणाऱ्यांच्या मदतीने सागरचा मृतदेह सायंकाळी उशिरा पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.