जिल्हा पोलीस दलाची कामगिरी ; दोन महिला ताब्यात ?
रावेर (प्रतिनिधी) – शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास दोन महिलांकडून कोट्यवधी रुपये किंमत असलेली ब्राउन शुगर पोलिसांच्या विशेष पथकाने जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक फैजपूर, स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस अधिकारी दाखल झाले होते. दोन महिलांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत असलेला अंमली पदार्थ म्हणून ब्राऊन शुगर ओळखला जातो. रावेर शहरात दोन संशयित महिला ब्राऊन शुगर घेऊन काही व्यक्तींशी व्यवहार करणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आणि त्यांच्या टीमने रावेर शहरात सापळा रचला. त्यानुसार सकाळी १० वाजेच्य सुमारास पोलिसांनी हा व्यवहार होण्याआधीच संशयित महिलांना ब्राऊन शुगर सहित ताब्यात घेतले.
या कारवाईबाबत तपास करण्यात येत आहे. अधिक माहिती संध्याकाळी पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले देत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले, रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे, तर तहसीलदार उषाराणी देवगुणे व शासकिय पंच रावेर येथे हजर झाले होते.