म्हसावद-नागदुली ३३ केव्ही लाइनचे लोकार्पण
जळगाव (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शिवारात अंधार असू नये, त्याला दिवसा वीज मिळावी, यासाठी कटिबद्ध असून, पुढील टप्प्यात सौर प्रकल्प उभारणीवर भर दिला जाणार असून, म्हसावद-बोरनार येथे मोठा सौर प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हसावद-नागदुली ३३ केव्ही लाइनच्या लोकार्पणप्रसंगी बोलतांना दिली.
म्हसावद-नागदुली ३३ केव्ही लाइनचा लोकार्पण कार्यक्रम शनिवार, दि. २६ रोजी झाला. अभियंता महाजन या ३३ केव्ही लाईनच्या फायद्याची माहिती देताना म्हणाले, की १९ गावांसह जळगाव शहराच्या उपनगरातील सुमारे ५ लाख नागरिकांना अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा या लाईनमुळे शक्य होणार आहे. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सहा महिन्यांत काम पूर्ण केल्याबद्दल पालकमंत्री यांनी एजन्सी व वीज वितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे यावेळी कौतुक केले. यावेळी जळगाव शहर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाल महाजन यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.