नागपूर शहरातील घटना, मुलगी गोंदियातील !
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील एका ३० वर्षीय तरुणाला विवाह लावून देण्याच्या आमिषाखाली नागपूर जिल्ह्यात आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत तरुणाच्या तक्रारीवरून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. घटनेची नागपूर पोलीस माहिती घेत असून विवाह लावून देणारी एजंटांची टोळी कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कॉलनीत ३० वर्षीय तरुण आई, वडील, भाऊ यांच्यासह राहतो. त्याला एजंट विसनजी टारजन याने लग्नासाठी गोंदियाचे स्थळ सुचविले होते. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात तरुणाचे आई, मामा व नातेवाईक हे दहिगाव पथोडीया ता. आमगाव येथे गेले होते. मुलगी पाहिल्यानंतर पसंत पडली. त्यानुसार १० जून रोजी नारळ गोटा झाला. त्यावेळी १० हजार रुपये मुलीच्या नातेवाईकांनी घेतले. त्यानंतर लग्नाची २२ तारीख ठरली. त्यानुसार नागपूर शहरातील कुराडी मंदिरात २२ जून रोजी मुलाचे व मुलीचे दोन्हीकडील नातेवाईक यांच्या उपस्थितीत हळद लावून विवाह पार पडला. त्यावेळी १ लाख ४० हजार रुपये मुलीकडच्यांनी घेतले.
त्यानंतर बिदाई झाल्यावर नागपूर शहर सोडल्यावर काही अंतरावर काही ४ ते ५ संशयितांनी त्यांचे वाहन अडवून वधूला नेण्यासाठी हट्ट धरला. एकाने तर, हि माझी बायको आहे. हिला कोठे नेत आहेत ? असे विचारून वधूला घेऊन गेले. त्यावेळी मुलीच्या घरच्यांना मुलाने जाब विचारण्यासाठी गेले. तर त्यांनी त्याला हाकलून लावले. आपली शुद्ध फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ते घाबरून गेले. दरम्यान, एजंट टारजन याला विचारले असता, त्यानेही हात वर केले.
मुलगा व त्याचे कुटुंबीय हताश होऊन जळगावी परतले. याबाबत आता नागपूर पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याची माहिती तरुणाने दिली आहे. दरम्यान, मुली दाखविणारे एजंटांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.