जळगाव ( प्रतिनिधी ) – जवळपास ३० वर्षे या भागाचे आमदार राहून एकनाथराव खडसे यांनी बोदवड तालुका आणि शहरासाठी काय केले ? असा प्रश्न विचारत आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर चौफेर टीका केली . नाथाभाऊ स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील नेता म्हणवतात आणि या शहरात साधे रस्तेही नाहीत ? , असेही ते म्हणाले . बोदवड नगरपंचायत निवडणुकीतील प्रचार सभेत ते बोलत होते .
आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की , ३० – ३५ वर्षात तुम्ही काय केले हे आधी सांगा . त्याचा हिशोब आता बोदवडकर विचारणार आहेत . येथे रस्त्याची अवस्था काय ? येथे बस स्टँड आहे की भंगारचे दुकान ? काय बोलावं तुमच्याबद्दल ? मी नेता मी नेता , असे नुसते बोलून काही होत नसते . येथे काही लोक सांगत होते कब्रस्थानाला व स्मशानभूमीला कंपाउंड केले . ते गेलेले लोक का तिथून पळून जाणार आहेत का ? जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी काय ? मला या भागात कमी मतदान मिळते म्हणून मी या भागाला निधी मिळू देणार नाही , अशा तुमच्या वल्गना आहेत . या शहराला महिन्यातून एकदा पाणी ? आणि म्हणे मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ! राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील म्हणतात गिरीश महाजनांनी जिल्ह्याचे वाटोळे केले ! काय केले ? भैय्यासाहेबांनी असे बोलावे का ? कशाला बोलायला लावता आम्हाला ? आतापर्यंत त्यांच्या विरोधात लढले आणि आता तुम्हीच त्यांच्या मागे फिरत आहेत आम्ही जामनेरला दररोज पाणी देतो , ६०० गाळे बांधलेत लोक आता मूर्ख बनणार नाहीत . कोथळीत तरी तुमचा सरपंच आहे का ? मुक्ताईनगरात तुमचा नगराध्यक्ष का नाही ? हे सांगा . जामनेरात काही मुस्लिमांसह मी २८ नगरसेवक भाजपच्या तिकिटावर निवडून आणले आहेत . म्हणे बोदवड तालुका केला . हा तालुका भाजप सरकार असतानाच झालाय एवढ्या वर्षात या शहराला तुम्ही काही तरी प्राथमिक सुविधा दिल्या असत्या . तुमचा काटा मारायचा वेळ आता गेलाय . आता दुकान बंद . चार – पाच टाळके आपलेच तुम्ही मोठे केले . घराणेशाही तुम्हाला सुटत नाही . हा नवीन तालुका झाला तर येथे तहसीलदार कार्यालय होणारच होते , त्यात काय विशेष ? म्हणे मी केले , मी मी म्हणणारांचा जमाना आता गेलाय . १५ वर्षे तुम्हाला लाल दिव्याची गाडी दिली येथे रस्तेही केले नाहीत . आता लोकांना विकत घेण्याची भाषा करीत आहेत . तुम्ही ३० वर्षे त्यांच्यावर विश्वास ठेवला आता फक्त एकदा आमच्यावर विश्वास ठेवा दीड वर्षात या शहराचा पाणी प्रश्न सोडवून दाखवीन . त्यासाठी केंद्राकडून पैसे मिळवा म्हणून प्रसंगी आमच्या खासदार रक्षाताईंचे पाय धरीन . विधानसभा निवडणुकीच्या आधी मी चार महिने मतदारसंघात गेलो नव्हतो . उमेदवारी अर्ज भरल्यानन्तर थेट मतदानालाच गेलो होतो तरीही निवडून आलो . तुम्हाला लोकांनी नाकारले आहे . नेहमी माझी मतांची आघाडी तुमच्यापेक्षा जास्त आहे त्यासाठी लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागते . आजही मुंबईत रुग्ण आणि सोबतच्या जवळपास शंभर लोकांची दररोज जेवणाची व्यवस्था आम्ही करतो जळगावात ५ – १० रुग्णवाहिका तयार असतात योजनेत बसवून किंवा कुठून मदत मिळवून रुग्णांच्या उपचारांची व्यवस्था आम्ही करत असतो . शेवटच्या माणसाची सेवा हेच भाजपचे धोरण आहे . कार्यकर्ते त्यासाठी राबतात . म्हणू ही वेळ निर्णायक आहे . बोदवडकरांनी आता पत्ता पालटवावाच , असेही ते म्हणाले .