बोदवड शहरात ११ लाखांची धाडसी घरफोडी
बोदवड (प्रतिनिधी) : येथील खाटिकवाड्यात कुटुंब झोपण्यासाठी गच्चीवर असताना चोरटयांनी घरात घुसून ११ लाखांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना मंगळवारी दि. २८ मे रोजी उघड झाली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागातील खाटीकवाड्यात शेतकरी व अंडापाव विक्रेते विलास सीताराम फाटे कुटूंबासह राहतात. उन्हाळ्यामुळे सर्व कुटूंबातील सदस्य सोमवारी रात्री गच्चीवर झोपले होते. ही संधी चोरट्यांनी साधत वरच्या मजल्याच्या दरवाजाला कडी लावून काम फत्ते केले. मंगळवारी पहाटे चार वाजता कुटूंबातील महिलेला जाग आल्यानंतर गच्चीचा दरवाजा उघडत असताना तो लॉक असल्याचे लक्षात आले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.
फाटे या शेतकर्याने घरात ९० क्विंटल कापूस भाववाढीच्या आशेने साठवला. आठ दिवसांपूर्वीच त्यांनी कापसाची विक्री केली व त्यातून आलेले ५ लाख २० हजार व अंडा-पाव विक्रीच्या व्यवसायातील ८० हजार मिळून त्यांनी ६ लाख रुपये लाकडी कपाटात ठेवले होते. दि. ५ मे रोजी मुलगा प्रतीकचे लग्न झाल्यानंतर सुनेचे १४ तोळ्याचे दागिनेही कपाटात ठेवल्याने मोठी संधीच चोरट्यांना उपलब्ध झाली. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फाटे कुटूंबाच्या घरात प्रवेश केला. आधी कुटूंब गच्चीवर गाढ झोपेत असल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी गच्चीचा दरवाजा आतून बंद केला.
त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील सर्व ११ लाख ५ हजारांचा ऐवज लांबवला. मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्यासह अधिकार्यांनी भेट दिली. तसेच जळगाव पोलीस दलातील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्वान जागेवरच घुटमळले. बोदवड पोलिसात विलास फाटे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. दुसर्या घटनेत शहरातील उजनी रस्त्यावरील विजय बडगुजर यांच्या शेतात महादेव मंदिरात असलेला पंचधातुचा अकरा किलो वजनाचा नाग ही चोरीला गेल्याचे दिसून आले आहे.