बोदवड तालुक्यातील मनूर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : बोदवड तालुक्यातील मनूर येथे किरकोळ कारणावरून पती-पत्नीला गावातील संशयित आरोपींची बेदम मारहाण केली होती. या घटनेत पती गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होते. रविवारी दि. २५ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. सदर तरुण हे बोदवड तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला घटनेची माहिती घेण्याचे काम सुरु होते.
विलास सीताराम पाटील (वय ४०, रा. मनूर ता. बोदवड) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते मनूर गावात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. बोदवड येथील तहसील कार्यालयात ते शिपाई म्हणून कार्यरत होते. (केसीएन) नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दरम्यान, गुरुवारी दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी एक साप निघाला म्हणून त्याला ठार मारले होते. त्यांनतर मेलेला साप हा मयत विलास पाटील यांच्या घराच्या अंगणात फेकला. याचा विलास पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील यांनी जाब विचारला.
त्याचा राग आल्याने संशयितांनी विलास पाटील व त्यांच्या पत्नी विद्या पाटील यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच काठीने मारहाण करून जबर जखमी केले. यानंतर इतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मार जास्त असल्याने विलास पाटील यांना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.(केसीएन) त्यानंतर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता विलास पाटील यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
विलास पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील यांनी “केसरीराज” शी बोलताना सांगितले की, नशिराबाद पोलिसांनी जबाब नोंदवले आहे. पती विलास पाटील यांना नाना बाबुराव पाटील, विजय बाबुराव पाटील, नरेंद्र नाना पाटील, पवन नाना पाटील, अक्षय विजू पाटील यांच्यासह चार महिलांनी बेदम मारहाण केली होती. त्यात पती विलास पाटील यांचा मृत्यू झाला.(केसीएन)आता या मारहाण करणाऱ्यांवर अटक करून शासन झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी “केसरीराज”शी बोलताना केली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी बोदवड पोलीस माहिती घेत असून खूनप्रकरणी बोदवड तालुक्यात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील खुनांची मालिका थांबायला तयार नाही.