जळगाव महापालिकेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा ‘काऊंटडाऊन’ सुरू
उबाठाकडून शरद तायडेंचाही अर्ज दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेने आता वेग घेतला असून, आज बुधवारी (दि. २५) विविध राजकीय पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवारांची नावे प्रशासनाकडे सुपूर्द केली आहेत. येत्या सोमवार, ३० मार्च रोजी होणाऱ्या विशेष महासभेत या नावांची अधिकृत घोषणा होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यात विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला एकच जागा असताना मात्र २ प्रस्ताव दाखल झाले आहे. भाजपकडून जेष्ठांना, शिंदे सेनेकडून तरुणांना तर उबाठाच्या गटनेत्यांकडून महिलेला संधी देण्यात आली आहे.


महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे आज विविध गटांनी आपले सर्व प्रस्ताव दिले. यामध्ये भारतीय जनता पक्षकडून डॉ. राधेश्याम चौधरी, राहुल वाघ, रमेश मतानी, सुभाष शौचे आणि प्रदीप रोटे तर शिवसेना (शिंदे गट) कडून हर्षल मावळे आणि उद्योजक नरेंद्र सोनवणे यांना संधी मिळाली आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या गटात दोन वेगळी नावे समोर आल्याने पेच निर्माण झाला आहे. गटनेते इब्राहिम पटेल यांनी युगंधरा अमित साळुंखे यांचे नाव सुचवले आहे, तर जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी शरद तायडे यांचा प्रस्ताव बाळासाहेब कंखरे व उमेश चौधरी यांच्यामार्फत सादर केला आहे.
सादर करण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांची कायदेशीर छाननी शुक्रवारी, २७ मार्च रोजी आयुक्तांच्या दालनात पार पडणार आहे. यामध्ये उमेदवारांची पात्रता आणि तांत्रिक बाबी तपासून पात्र नावांची यादी अंतिम केली जाईल. त्यानंतर ३० मार्चच्या विशेष सभेत यावर शिक्कामोर्तब होईल. आज प्रस्ताव सादर करताना महापालिकेत राजकीय हालचालींना उधाण आले होते. यावेळी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) तर्फे मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
यावेळी भाजप गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गणेश सोनवणे, ऍड.दिलीप पोकळे, सागर सोनवणे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शुक्रवारी २७ रोजी आयुक्तांच्या कार्यालयात १२ वाजता अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. ठाकरे गटातील दोन वेगवेगळ्या प्रस्तावांमुळे ३० मार्च रोजी नक्की कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीनंतर महापालिकेतील अंतर्गत सत्तासमीकरणांना नवी धार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








