जळगाव (प्रतिनिधी) – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील गुन्हेगार अर्णब गोस्वामी याला झालेल्या अटके संदर्भात जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी न्यायपालिकेचे व पोलिसांचे आभार मानून महाराष्ट्राच्या मातीतील मराठी महिलेला मिळालेला हा न्याय आहे व तसेच अर्णब गोस्वामी यासारख्या गुन्हेगाराला वाचविण्याकरिता भाजप पक्षाने शहरात केलेल्या आंदोलनाला “पोपट बचाव” आंदोलन असे नाव देऊन गुन्हेगाराला पाठीशी घालणा-या आंदोलनाचा जाहीर निषेध देखील व्यक्त केला.

2018 साली अन्वय नाईक हे व्यवसायाने इंटेरियर डिझायनर होते, त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या कार्यालयाचे इंटेरियर काम केले असता, त्या कामाचे 83 लाख रुपये हे अर्णब गोस्वामी यांच्याकडे बाकी असताना त्यांनी ऐनवेळेस ते पैसे देण्यास नकार दिला व या दबावाखाली मजबुरीने अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. परंतु आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या आपल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांची नावे लिहिलेली आहेत व त्या अनुषंगानेच न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आज पोलिसांनी अर्णब गोस्वामी फिरोज शेख व नितेश सारडा यांना अटक केली.
परंतु भाजप पक्षाने या अटकेचे राजकारण करत एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी व जणूकाही एक प्रकारे भाजपच्या कार्यकर्त्यालाच अटक झाली या प्रकारचा आव आणत, संपूर्ण महाराष्ट्रभर भाजप पक्षाच्या या पोपटाला वाचवण्याचं काम आंदोलनाच्या माध्यमातून भाजप पक्षाने सुरू केलं.
परंतु काँग्रेस पक्षाची भूमिका अतिशय स्पष्टपणे महाराष्ट्राच्या मातीमधील या मराठी महिलेचाच बाजूने राहणार आहे. जोपर्यंत या महिलेला न्याय मिळत नाही व गुन्हेगाराला कठोर शासन होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष व एनएसयूआय संघटना अतिशय खंबीरपणे अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांसोबत राहणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.







