वाचा, कोणत्या मतदान केंद्रावर घडली घटना…
बीड (वृत्तसेवा) :- येथील विधानसभा मतदारसंघात एक दुखःद घटना घडली आहे. अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे(वय ४५)यांचे विधानसभा मतदान प्रक्रियेदरम्यान निधन झाल्याचे समजत आहे. त्यांचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शोक व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. आपल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेब शिंदे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. त्यामुळे, आज मतदानाच्या दिवशी ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् ते खाली पडले. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिंदे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून उमेदवार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनाही या घटनेनं मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, सातारा जिल्ह्यातदेखील एक धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करतानाच एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही घटना घडली आहे. शाम धायगुडे असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.