बीड ( प्रतिनिधी ) – सतत खून, दरोडे, बलात्कार, घरफोडी, जबरी चोरीच्या घटनानी बीड जिल्हा हादरला आहे. महिला अत्याचाराचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नव्या आकडेवारीनुसार विचार केल्यास बीड जिल्ह्यामध्ये अवघ्या अडीच तासाला एक महिला वासनेची शिकार होत आहे तर सहा दिवसाला एकाची हत्या घडत आहे.

बीडमध्ये चोरीचे गुन्हे मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढले आहेत. विनयभंगाच्या गुन्ह्यांतही भर पडलेली आहे. 2020 मध्ये ऑक्टोबर अखेरपर्यंत विनयभंगाच्या 270 घटना घडल्या होत्या. यंदा अशा गुन्ह्यांची संख्या 325 झाली आहे. सरकारी नोकरांवरील हल्ले व बाललैंगिक अत्याचारात मात्र घट झाली आहे. 2020 मध्ये जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान 55 सरकारी नोकरांवर हल्ले झाले होते, यंदा ही संख्या 41 आहे. गेल्या वर्षी दहा महिन्यांत 48 अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला होता. यंदा हा आकडा 31 इतका आहे. मागील वर्षी अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे 73 गुन्हे घडले होते. या वर्षी गुन्ह्यांची नोंद 69 अशी आहे.
बीड जिल्ह्यात ऑक्टोबर 2021 पर्यंत 48 खून, 128 खुनाचे प्रयत्न, 128 बलात्कार, 18 दरोडे, 32 जबरी चोऱ्या, 46 घरफोडी, 293 चोऱ्या तर 328 मारामाऱ्या झाल्या आहेत.
शेती-संपतीचे वाद, टोकाची सूडभावना, अनैतिक संबंध आणि संशयातून कधी मुलगा जन्मदात्याचा खून करतो तर कधी पिताच पोटच्या पोराचा जीव घेतो, अशा घटना समोर आल्या आहेत. परळीत प्लॉटिंगचे व्यापारी अजय लुंकड यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आल्यानंतर शहर पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. त्यांचा जेमतेम 19 वर्षांचा मुलगा सिद्धार्थ यानेच त्यांना थंड डोक्याने संपवल्याचे तपासात निष्पन्न झाले. वडील आपल्यावर प्रेम करीत नाहीत, काँप्यूटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी पुण्याऐवजी औरंगाबादला ठेवल्याचा राग असह्य झाल्याने हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली.कायदा व सुव्यवस्था राखण्यासह गुन्हेगारीला ब्रेक लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.







