वाचा, खान्देशात नेमकी कुठे घडली घटना…
नंदुरबार (प्रतिनिधी) : तळोदा तालुक्यातील चिनोदा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात कार्तिक राजेश पाडवी हा ८ वर्षीय बालक ठार झाला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कार्तिक हा आजोबा आणि वडिलांसोबत शेतात गेलेला होता, परंतु बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातल्याने ते काहीच करू शकले नाहीत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्तिकचे आजोबा पुण्या जेहऱ्या पाडवी हे गुरांसाठी चारा कापत असताना कार्तिक हा परिसरात खेळत होता. खेळत खेळत तो आजोबांपासून काही अंतरावर गेल्यामुळे त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. काही कळण्याच्या आत बिबट्याने त्याला झुडूपात ओढून नेले. पुण्या पाडवी यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. परंतु तोवर कार्तिकचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थ शेतात मदतीसाठी धावून गेले पण उशीर झालेला होता.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, परिविक्षाधीन वनक्षेत्रपाल सूरज आवारे, वासू माळी, वनपाल भारती सयाईस, वनरक्षक नामदेव डोंगरे, जान्या पाडवी, आशुतोष पावरा, राहुल कोकणी, गिरधन पावरा, संदीप भंडारी, महेंद्र तडवी, वीरसिंग पावरा, दीपक बाळदे हे शेतात दाखल झाले होते. पथकाने बिबट्यांच्या पावलांचे ठसे घेत माहिती घेतली. वन विभागामार्फत जागेची पाहणी करून पिंजरा लावण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती.