एरंडोल तालुक्यातील बांभोरी शिवारातील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बांभोरी शिवारात शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास १० महिने वयाची मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली. हा मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचा निष्कर्ष वन विभागाने काढला आहे. या बिबट्याने मोठ्याने आरोळी ठोकली अन् काही क्षणातच तो मृत झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कासोदा येथील भागवत त्र्यंबक चौधरी यांच्या बांभोरी शिवारात ते स्वतः व घरातील सदस्य शेतकाम करीत असताना एका पशूचा ओरडण्याचा आवाज आल्याने ते त्या दिशेने धावत गेल्यावर एक बिबट्या ओरडताना दिसला. (केसीएन)पण तो काही मिनिटांत मृत झाला, अशी माहिती भागवत चौधरी यांनी दिली.
ही घटना सकाळी वाऱ्यासारखी गावात पसरली. घटनास्थळी दूध संघाचे संचालक दगडू चौधरी, सरपंच पुरुषोत्तम चौधरी, माजी सरपंच महेश पांडे हे पोहोचले. नंतर गावकऱ्यांनी येथे मोठी गर्दी केली होती. एरंडोलच्या वन विभागाला ही घटना कळवल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
ही बिबट्या मादी रस्ता चुकून इकडे आली असावी. हा खाद्य नसलेला परिसर आहे. तिला शिकार मिळाली नसावी, त्यामुळे ती उपाशी राहिली, त्यात तिला मणक्यांचा आजार झाला व त्यात तिचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. या बिबट्यासोबत आणखी त्याचे साथीदार असण्याची शक्यता नाही, अशी माहिती वनविभागाचे शिवाजी माळी यांनी दिली आहे.
वन पथकात वनक्षेत्रपाल बळवंत पाटील, वनपाल देविदास जाधव, अनिल साळुंखे, वनरक्षक विजय माळी, शिवाजी माळी, रामचंद्र मोरे, रवींद्र पाटील व अनिल मर्दाने यांचा समावेश होता. पथकाने बिबट्याला एरंडोल येथे नेऊन त्याचे भडगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. ही बिबट्या मादी असून ती १० महिने वयाची असावी. तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता, त्यामुळे ती कुपोषणामुळे मृत झाल्याची माहिती वनविभागाने दिली.