जामनेर ( प्रतिनिधी ) – शहरापासून जवळच असलेल्या ऋषिकेश नर्सरी भागात आज सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना घडली .
जामनेर कडून बोदवडकडे जाणाऱ्या मार्गावर जामनेरपासून अंदाजे दिड किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली . अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे . या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले . जामनेर ते बोदवड मार्ग या राखीव वनक्षेत्राच्या अगदी लगत आहे . काही प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती वन खात्याच्या कार्यालयाला दिली होती .
ही माहिती मिळाल्यावर वन परिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित यांच्या सूचनेवरून वनरक्षक ठोंबरे , पी एस भारुडे , प्रशांत पाटील , वनपाल सुनील पाटील , प्यारेलाल महाजन , विकास गायकवाड , अशोक ठोंबरे वनमजूर चरणदास चव्हाण , विजय चव्हाण आदींनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला . या पथकाने बिबट्याचा मृतदेह वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात आणला . तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या मृतदेहाचे निरीक्षण केले . उद्या पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत व्यहारे हे या बिबट्याचे शवविच्छेदन करणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत .
या राखीव वन क्षेत्रात आणखी पाच बिबटे आहेत अशी माहिती वन खात्याकडून देण्यात आली . बिबट्यांसह या जंगलातील वन्यपशुंना मुक्तसंचार करता यावा , त्यांचा नैसर्गिक अधिवास माणसांकडून किंवा अन्य कोणत्याही कारणांनी बाधित होऊ नये म्हणून यापुढे उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे .