जामनेर तालुक्यातील शहापूर परिसरातील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शहापूर येथील नदी परिसरामध्ये बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याचे नागरिकांना दिसून आले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, बिबट्याचा मृत्यू कसा झाला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
जामनेर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात बिबट्यासारख्या हिंस्र श्वापद प्राण्यांचे प्रमाण अधून मधून दिसून येत असल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये बिबट्यांच्या संचारामुळे अनेक गावांमध्ये रात्री घराबाहेर निघण्यास ग्रामस्थ टाळत आहेत. बुधवार दि. ३ जुलै रोजी दुपारी तालुक्यातील शहापूर शिवारामध्ये नदीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस पाटील आणि वनविभागाला याबाबत सूचना दिली.
वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वन अधिकारी अमोल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास गणेश खंडारे करीत आहेत. मात्र बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला असेल याविषयी अधिकृत माहिती मिळालेली नाही.