भडगाव तालुक्यातील बांबरुड येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बांबरूड प्र. ब. येथील शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाखाली गायी व म्हशी बांधलेल्या होत्या. त्यांच्यातून लाकडासह वासरीला काही अंतरावर बिबट्याने फरफटत नेऊन ठार केले.
शक्तीसिंग धीरसिंग परदेशी यांच्या शेतात बांधलेल्या वासरीला लाकडासह काही अंतरावर बिबट्याने फरफटत नेत ठार केल्याची घटना दि.१२ रोजी मध्यरात्री घडली. शेतकरी व सालदार सकाळी जनावरांचे दूध काढण्यासाठी शेतात गेले असता घटना उघडकीस आली.
यात पशुमालकाचे १५ ते १६ हजारांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली व या घटनेचा पंचनामा केला. बांबरूड प्र. ब. शेतशिवारात यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात २ ते ३ जनावरे ठार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच याठिकाणी पिंजरे लावावेत व बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी पशुमालक व शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या शेतांमध्ये कापूस वेचणीसह इतर पिकांच्या कापणीची कामे सुरू आहेत. बिबट्याच्या अस्तित्वामुळे शेतमजूर, शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.