बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ(प्रतिनिधी) :- काही दिवसांपूर्वी नाशिकला ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्याचे थेट कनेक्शन चाळीसगावाशी उघड झाले होते. अशातच आता पुन्हा भुसावळ येथे दि. १९ च्या रात्री बाजारपेठ पोलिसांनी दोन जणांना ड्रग्स बाळगत असताना राष्ट्रीय महामार्ग ५३ वर अटक केली. या कारवाईत तब्बल ७३ लाखाचे मेथाक्वालोन जप्त करण्यात आले आहे.
नाशिक येथे मेथाक्वालोन नावाच्या ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळेस चाळीसगाव व नाशिक असे कनेक्शन उघड झाले होते. त्यानंतर अल्पशा प्रमाणात जळगावमधून मेटा क्वीन नावाचा आमली पदार्थ जप्त केला होता. आता पुन्हा मोठा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले प्रशांत सोनार या कर्मचाऱ्याला मेथाक्वालोनचा (पांढरा रंगाच्या बारीक दाणेदार मादक पदार्थ) मोठा साठा घेऊन दोन जण फिरत असल्याची माहिती मिळाली.
याबाबत डी.वाय.एस. पी कृष्णांत पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघम व इतर सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या हॉटेल मधुबन जवळ दोन जणांना संशयितरित्या फिरत असताना अटक केली. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ९१० ग्रॅम मेथाक्वालोन ज्याची किंमत ७२ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. तो जप्त करण्यात आला. मेथाक्वालोन साठा व वीस हजार किमतीचे दोन मोबाईल जप्त केले. संशयित आरोपी कुणाल भरत तिवारी (रा. तापी नगर, भुसावळ), जोसेफ जॉन वाडाल्यारेस (रा.कंटेनर यार्ड भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पीएसआय मंगेश जाधव करीत आहे. पोलीस कर्मचारी व अधिकारी तिसऱ्या आरोपीच्या शोधात गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.