मध्य रेल्वे कर्मचारी कल्याण निधितर्फे आयोजन
भुसावळ (प्रतिनिधी):- विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या नेतृत्वात तथा अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन यांच्या मार्गदर्शानाखाली, मध्य रेल्वे मुख्यालायाचे मुख्य कार्मिक अधिकारी (औद्योगिक संबंध) श्री अनुराग मेश्राम यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वे कर्मचारी कल्याण निधी भुसावळ विभागातर्फे एक दिवसीय मानसिक आरोग्य शिबिर भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात श्रीमती शुभांगी रस्तोगी, मुख्य कार्यकारी अधिकारी, माइंड अलकोव संस्था यांनी मार्गदर्शन केले. ही संस्था कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासंबंधित विविध समस्या, तणाव व्यवस्थापन आणि समुपदेशन क्षेत्रात कार्य करते. कार्यरत असताना तसेच वैयक्तिक जीवनात रेल्वे कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या मानसिक तणावांना सामोरे जावे लागते. या तणावातून बाहेर पडून जीवन सकारात्मक दृष्टिकोनातून कसे जगावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी अत्यंत सोप्या व प्रभावी टिप्स सांगितल्या. मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी दीर्घ श्वसन, स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे यासारख्या उपाययोजनांची माहिती देत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कृष्णचंद्र सभागृह येथे आयोजित पहिल्या सत्रात सुमारे ३०० रेल्वे कर्मचाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला, तर दुसऱ्या सत्रात सुमारे 85 कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक समुपदेशनात सहभाग नोंदविला. या शिबिरास उपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमामुळे त्यांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात निश्चितच सकारात्मक बदल होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलीप आर. खरात, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी, सर्व सहायक कार्मिक अधिकारी, कर्मचारी व कल्याण निरीक्षक तसेच भुसावळ मंडळातील कर्मचारी कल्याण निधी सदस्य यांनी परिश्रम घेतले.









