भुसावळ रेल्वे विभागात जागतिक महिला दिवस उत्साहात
भुसावळ (प्रतिनिधी) : दि. ८ मार्च रोजी संपूर्ण भुसावळ विभागामध्ये जागतिक महिला दिवस विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रम घेण्यात आले, ज्यामध्ये महिला कर्मचार्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
भुसावळ रेल्वे स्थानकावरून खंडवा दिशेने एक विशेष गुड्स ट्रेन (मालगाडी) पूर्णतः महिला कर्मचाऱ्यांच्या संचालनाखाली रवाना करण्यात आली. या विशेष गुड्स ट्रेनचे नेतृत्व महिला लोको पायलट ज्योती सिंग, सहायक लोको पायलट शिवानी, आणि गुड्स ट्रेन मॅनेजर भाग्यश्री पिंपळे यांनी केले. या विशेष गुड्स गाडीला मंडळ रेल्वे प्रबंधक इति पाण्डेय यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. महिलांच्या कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे हा दिवस अधिक विशेष ठरला.
मंडळ रेल्वे प्रबंधक इति पाण्डेय यांनी भुसावळ स्टेशनवरील टीटीई लॉबीमध्ये महिला टिकट तपासणी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. दरम्यान, अहमदाबाद ते बरोनी एक्सप्रेस या रेल्वेगाडीत भुसावळ ते इटारसी दरम्यान संपूर्ण टिकट तपासणी कार्य महिला कर्मचाऱ्यांच्या विशेष टीमने पार पाडले. या संपूर्ण उपक्रमामुळे महिला सशक्तीकरणाचा सकारात्मक संदेश देण्यात आला. भुसावळ येथील कृष्णचंद्र सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मंडळ रेल्वे प्रबंधक इति पाण्डेय यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये रंगोली स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा यांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान, वरिष्ठ चिकित्सा अधिकारी डॉ. विनीला यांनी उपस्थित महिलांना विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून महिलांचे आरोग्य, तणाव व्यवस्थापन, आणि कार्यक्षेत्रातील योगदान याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे अनुभव शेअर करताना आपल्या सशक्तीकरणाचा आणि स्वतंत्र निर्णय क्षमतेचा उल्लेख केला. भुसावळ नियंत्रक कार्यालयातील ‘पिंक रेल मदद कक्ष’ येथे मंडळ रेल्वे प्रबंधक यांनी सर्व कार्यरत महिला कर्मचारी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर मंडळ रेल प्रबंधक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर मंडळ रेल प्रबंधक (तांत्रिक) मुकेश कुमार मीना, सर्व शाखाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळ रेल्वे विभागाने महिलांच्या योगदानाचा गौरव करत समाजात त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.