वरिष्ठांसह सहकाऱ्यांवर छळाचा आरोप ; संशयितांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी

जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयाचे प्रमुख भूमापक संजय नामदेव पाटील ( वय ५२ ) यांनी विष प्राशन केले होते . आज त्यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचारादरम्यान निधन झाले त्यांचा वरिष्ठांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ होत होता असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनीही केला आहे . संशयितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला .
कार्यालयातील काही लोकांच्या नावांसह लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली होती . प्रमुख भूमापक पदावर त्यांची नियुक्ती २०१९ सालात करण्यात आली होती . विष प्राशनाच्या आदल्या दिवशी ते कार्यालयातच मुक्कामी थांबले होते . दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला जात नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेंव्हा त्यांना संजय पाटील बेशुद्धावस्थेत दिसले . या कर्मचाऱ्यांनी त्यांना आधी स्थानिक सरकारी रुग्णालयात आणि नंतर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले होते . त्यांचा मुलगा प्रशांत पाटील याने सांगितले . खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ईसीजीसाठी त्यांचे कपडे काढले तेंव्हा त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली होती .
या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की , त्यांच्या नियुक्तीपूर्वी प्रमुख भूमापक पदावर आर एस जाधव होते . सोनवणे यांनी डाटा एंट्री केली नाही . डाटा एंट्रीचा सरकारकडून मिळणार मोबदला सोनवणे आणि जाधव यांनी वाटून घेतला . व्ही एल पाटील यांनी मोजणीचे काम दुसर्याकडून डीएससी करून घेतली . मोजणीला संजय पाटील यांना पाठवले जात होते . या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे.







