भुसावळ ;- अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी नवरात्रोत्सव काळात शहरातील 50 जणांना शहरबंदी करण्याचे आदेश काढले आहेत. 10 ते 13 ऑक्टोबरपर्यत उपद्रवींना शहरात बंदी करण्यात आली आहे.
शहरात दुर्गोत्सवाच्या काळात शेवटचे चार दिवस शहरातील व ग्रामीण भागातील 50 उपद्रवींना शहरबंदी करण्यात यावी, जेणे करून दुर्गा विसर्जन शांततेत पार पडेल यासाठी पोलीस प्रशासनाकडून अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळताच 10 ते 14 असे चार दिवस 50 उपद्रवींना शहरबंदीचे आदेश बजाविण्यात आले.
दुर्गोत्सवाच्या काळात शहरात शांतता राहावी, विसर्जन मिरवणूकीत कुठलाही गोंधळ होऊ नये, कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून बाजारपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपद्रवींच्या शहरबंदीचे प्रस्ताव तयार करून अपर पोलीस अधीक्षक नखाते यांच्याकडे गेल्या आठवड्यात पाठविले होते.
त्या प्रस्तावावर अपर अधीक्षक यांनी आदेश काढले आहे. पोलीस प्रशासनाकडून शहरबंदीचे आदेश असतांनाही जर कोणी आदेशाचे उल्लंघण करून शहरात फिरतांना आढळल्यास त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी दिला आहे.