पतसंस्थेत २०१४ साली घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) – भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत ठेवींचे पैसे मागायला गेले म्हणून विवेक ठाकरे व पुणे तसेच जळगाव मधील २५ ठेवीदारांवर एमआयडीसी पोलिसांत संस्थेचे तत्कालीन चेअरमन प्रमोद रायसोनी यांनी संस्थेत गैरकायद्याची मंडळी जमवून संस्थेत तोडफोड करून कामात हस्तक्षेप केला म्हणून २०१४ मध्ये दाखल केला होता. या गुन्ह्यांत आरोप सिद्ध झाला नाही म्हणून सर्वांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वैभव जोशी यांनी निर्दोष मुक्त केले आहे.
बीएचआर संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रमोद उर्फ अंकल रायसोनी यांनी ठेवीदारांच्या रकमा स्वहितासाठी वापरून संस्था अडचणीत आणल्याचा जाब विचारण्यासाठी आणि आपल्या ठेवी परत मिळाव्यात ही मागणी घेवून ठेवीदार संघटनेच्या वतीने २१ नोव्हेंबर २०१४ रोजी संस्थेच्या एमआयडीसी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. ठेवीदार गैरकायद्याची मंडळी जमवून धाक,दडपशाही व मृत्यूस कारणीभूत कृत्य करून संस्थेत तोडफोड करीत असल्याची फिर्याद संस्थेचे दिनेश युवराज चौधरी यांनी पोलिसांत रिपोर्ट दिल्यावरून गुन्हा दाखल झाला होता. ठेवीदारांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए.बागुल यांनी केला.
विवेक ठाकरे, दामोदर दाभाडे, सुरेश पवार, दिलीप पाठक, महेंद्र जोशी, शिवराम चौधरी, भिका त्र्यंबक पाटील, सुधीर जाधव, शंकर पाटील, श्रावण वालजी पाटील, अनंत मोयनाक, सचिन पार्टे, गिरीष स्वामी, गणेश भंडारी अशा जळगाव व पुण्यातील एकूण २५ ठेवीदारांविरोधात जळगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात खटला चालविण्यात आला. तथापि पोलिसांनी घटनास्थळी कोणतीही मारहाण व तोडफोड केलेली वस्तू जप्त न करणे आणि ठेवीदारांनी त्यांच्या ठेव रकमा परत मागण्यासाठी संस्थेत जाणे हा गुन्हा नसल्याचे सिद्ध झाले. सर्व संशयित आरोपींना दोषमुक्त ठरविण्यात आले.सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.आर.पी.सुरळकर तर सर्व ठेवीदार यांच्या बचाव पक्षाच्या वतीने ॲड.वाय.डी.सिकवाल यांनी काम पाहिले.